शिरूर अनंतपाळ तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामावर पावसाचे पाणी फेरले. तालुक्यातील २२ हजार ३७५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी दहा हजारांची मदत जाहीर केली होती.
पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ३२ गावांतील ११ हजार ९३२ शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. परंतु, उर्वरित १७ गावांतील १० हजार ५५७ शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे अनुदानाचा लाभ देण्यात यावा, अशी सातत्याने मागणी होत होती. या शेतकऱ्यांचे अनुदानाकडे डोळे लागले होते.
अनुदानाचा या गावांना लाभ...
पहिल्या टप्प्यात ३२ गावांना ७ कोटी ४८ लाख ६९ हजार ५२९ रुपये मंजूर झाले होते. परंतु, १७ गावांतील शेतकरी प्रतीक्षेत होते. यामध्ये भिंगोली, येरोळ, रापका, लक्कड जवळगा, वांजरखेडा, शिवपूर, शेंद, सागंवी घुग्गी, सावरगाव,
सरफराजपूर, सुमठाणा, हालकी, उजेड, हिप्पळगाव, होनमाळ, साकोळ, शिरूर अनंतपाळ या गावांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान जिल्हा बँकेच्या विविध शाखांद्वारे आठवडाभरात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अतुल जटाळे, लेखाधिकारी नितीन बनसोडे यांनी सांगितले.