रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील मोरवड शिवारातील गट क्र. २१३ मधील २२ बाय २२ अशा प्लॉटमध्ये अवैधरित्या अफूच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने रेणापूर पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. तेव्हा ६८० झाडे जप्त केली. त्याची किंमत १ लाख ४८ हजार ४०० रुपये आहे. याप्रकरणी एकाविरुध्द रात्री उशिरा रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणापूर पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील मोरवड शिवारातील गट क्र. २१३ मध्ये शेतकरी विठ्ठल बाबासाहेब क्षीरसागर (रा. मोरवड) यांच्या शेतात अफूजन्य पदार्थाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती रेणापूर पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सदरील ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक ते अडीच फुट उंचीची, लहान- मोठी झाडे, ज्यांची पाने, बोंड व फुले पांढरी असलेली ६८० झाडे दिसून आली.
त्याचे अंदाजे वजन २१ किलो २०० ग्रॅम असेल. त्याची एकूण किंमत १ लाख ४८ हजार ४०० रुपये आहे. ही झाडे पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा वरील शेतकऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भंडे करीत आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कन्हेरे, गौतम घाडगे ,बालाजी डप्पडवाड, एफ.सी. मुंडे, सूर्यवंशी आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
मोरवड शिवारात अफूची शेती केल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्याआधारे शुक्रवारी सायंकाळी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे अफूची झाडे लागवड केल्याचे दिसून आले. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.- दीपक शिंदे, पोलीस निरीक्षक.