हाळी हंडरगुळी हे बाजारचे गाव असल्याने परिसरातील २० ते २५ गावांचा दैनंदिन आर्थिक व्यवहार या गावाशी जोडलेला आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या एकूण ३० हजारांच्या जवळपास आहे. एवढी लोकसंख्या व येथील प्रसिद्ध बाजार असतानाही येेथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नाही. हाळी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक तर हंडरगुळी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक राष्ट्रीयीकृत असल्याने व्यापारी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, शेतकरी, बचत गटांचे सदस्य आदींचे येथे खाते आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची येथे गर्दी असते. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बॅंकिंग सेवेसाठी ताटकळत उभे रहावे लागत आहे. वारंवार बँकेचे नेटवर्क गुल होत असल्याने अडचणीत भर पडत आहे. बँकेत शाखाधिकारी व कॅशिअर असे दोनच कर्मचारी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
वरिष्ठांना माहिती कळविली...
ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांबाबत वरिष्ठांना माहिती कळविली आहे, असे शाखाधिकारी अशोक इज्जपवार यांनी सांगितले.