राजकुमार जोधळे/ लातूर
वक्तव्यातून मूळ विषयापासून लाेकांचे लक्ष विचलित करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांची मालिका सध्या महाराष्ट्र अन् मराठी माणसांविराेधात सुरू आहे. यातूनच मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचा आराेप विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी लातुरात रविवारी पत्रकार परिषदेत केला.
महात्मा ज्याेतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राबद्दल करण्यात आलेले वक्तव्य निषेधार्ह, आक्षेपार्ह आहेत. राज्यापालांबराेबर अनेकजण महाराष्ट्राच्या विराेधात जाणीवपूर्वक वक्तव्य करत आहेत का? अशी शंका आता यायला लागली आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. रामदेवबाबांनी केलेले व्यक्तव्य तमाम महिलांचा अवमान करणारे आहे. समाजमाध्यमातून जाणीवपूर्वकच समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज, व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. विखारी विचार प्रसारित करत जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आराेपही डाॅ. गाेऱ्हे यांनी केला. आमची भूमिका प्रबाेधनकारी हिंदुत्वाची आहे.
मराठी माणसांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न...
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून साेलापूर आणि अक्कलकाेट आम्हाला द्या, अशी भूमिका मांडण्यात आली आहे, तर गुजरातकडून महाराष्ट्रातील प्रकल्प, उद्याेग पळविण्याचे षड्यंत्र रचले जात आहेत. यातून महाराष्ट्र आणि येथील मराठी माणसांना अस्थिर करण्याबराेबरच त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गुजरात आणि कर्नाटकाकडून दबाव आणून अस्थिरता निर्माण केली जात आहे, असेही ते म्हणाले.
सर्वपक्षीय नेतृत्वांनी सीमाप्रश्न साेडवावा...
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचा सीमाप्रश्न प्रलंबित आहे. यातून मराठी माणसांविराेधात सतत कर्नाटकातील नेतृत्वाकडून बेतालपणे वक्तव्य केली जातात. शिवाय, वारंवार महाराष्ट्राला डिवचले जात आहे. हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतृत्वांनी संघटितपणे साेडविण्याची गरज आहे.
मुख्य विषयाला बगल देण्यासाठी आराेप...
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाणीवपू्र्वक आराेप केले जात आहेत. यातून मूळ विषयावरील लक्ष विचलित करण्याचा विराेधकांचा प्रयत्न आहे. प्रक्षप्रमुखांना ठरवून लक्ष्य केले जात आहे. विराेधकांना राज्याच्या विकासापेक्षा यातून केवळ राजकारण करायचे आहे.