दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली होती. गुरूवारी रात्री अहमदपूर परिसरात पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. अहमदपूरसह तालुक्यातील हाडोळती, कुमठा, शिवणखेड, हिप्पळगाव, थोट सावरगाव, आनंदवाडी, किनी, सय्यदपूर बोडका, शिरूर ताजबंद, वळसंगी, मांडणी, अंबेगाव, रोकडा सावरगाव, धानोरा, सताळा, किनगाव, अंधोरी, खंडाळी या भागात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.
अवकाळी पावसाने रब्बीची काढणी सुरू असलेल्या गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात यावर्षी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे रब्बीचा पेरा वाढला होता. काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी पिकाची काढणी सुरू केली असून पिकांची कापणी करुन शेतात ठेवले आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पिके पावसात भिजली आहेत. आंब्यासह फळबागांना फटका बसल्याचे शेतकरी वसंत पवार यांनी सांगितले.