लातूर : जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवार व शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले. यात मोठ्या प्रमाणावर रबी हंगामातील पिके, फळबाग, भाजीपाल्यांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानीची पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरु आहे. दरम्यान, आतापर्यंत ११ हजार ७९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनाम्यानंतर अंतिम नुकसानीची स्थिती समोर येणार आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात मागील दोन दिवस अवकाळी पाऊस व गारपीटीने रबी हंगामील गहू, ज्वारी, हरभरा, करडईसह आंबा, द्राक्षे, पपई, टरबूज, खरबूज यासह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय, या पावसात वीज पडून एका शेतकऱ्याचा तर ८ पशूधनाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या होत्या. तसेच त्यांनी प्रत्यक्ष रेणापूर व चाकूर तालुक्यात शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत प्राथमिक अंदाजानुसार ११ हजार ७९४ हेेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. यात जिरायत शेतीची १० हजार १३२ हेक्टर, बागायतीचे १ हजार २३३ तर ४२८ हेक्टरवरील फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.अवकाळी पावसात चाकूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चाकूर तालुक्यात ३, देवणी १, निलंगा तालुक्यात ४ पशुधन दगावली आहेत.
निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान...अवकाळी पाऊस व गारपीने निलंगा तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ८१५ हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. तर औसा तालुक्यात आतापर्यंत प्राथमिक अंदाजानुसार काहीच नुकसान झालेली नसल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात ७० हेक्टर, चाकूर १७५ हेक्टर, देवणी २३३४, जळकोट २५, लातूर ८१५, रेणापूर ३१३७, उदगीर २२३ आणि शिरुर अनंताळ तालुक्यात २०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
संपकाळतही कर्मचारी पंचनाम्यासाठी शेतावर...जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. मात्र, जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यासाठी जिल्हा प्रशासनला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन शेतावर पाेहचले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने सुरु असून, एक ते दोन दिवसांत अंतिम अहवाल तयार होण्याची शक्यता असून, त्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
४२८ हेक्टरवरील फळबागांना फटका...अवकाळी पाऊस व गारपीटीने ४२८ हेक्टरवरील फळबागांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक रेणापूर तालुक्यात १३३ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर अहमदपूर तालुक्यात १२, देवणी ६३, जळकोट २५, निलंगा ८०, लातूर ६५, उदगीर २०, शिरुर अनंताळ तालुक्यात ३० हेक्टरवरील फळपिकांना अवकाळीने फटका दिला आहे. तसेच जिल्ह्यात १० हजार १३२ हेक्टरवरील जिरायती तर १ हजार २३३ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.