लातूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गावभागासह प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई भागात अनेक जीर्ण इमारती आहेत. पावसामुळे अनेकांच्या भिंतीत पाणी मुरत असल्याने धोका निर्माण झाला आहे. यातून काही दुर्घटना होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने या भागात १३० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, तीन ठिकाणी सील करण्यात आले आहे.
लातूर शहरातील गाव भागात व बाजारपेठेत अनेक जुन्या व शंभर वर्षापुर्वीच्या ईमारती आहेत. त्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. या जुन्या ईमारती दगडी बांधकामाच्या असून त्यांचा काही भाग हा कोसळलेलाही आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसात अशा जीर्ण झालेल्या ईमारतींना अधिक धोका असतो. पावसाचे पाणी मुरल्याने अशा जीर्ण ईमारती पडून त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. गावभाग, गंजगोलाई परिसरात असलेल्या अशा जीर्ण व धोकादायक ईमारतीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन या ईमारतीबाबत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेळीच तातडीने कारवाई करण्याच्या सूचना मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मनपा प्रशासन कामाला लागले आहे. दोन दिवसात तीन ठिकाणी सील केले आहे.
गावभागात २२ धोकादायक इमारती...
गावभागातील आझाद चौक, मिस्कीनपुरा, पटेल चौक, माळी गल्ली, तेली गल्ली, राम गल्ली, देशपांडे गल्ली आदी भागात २२ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. तसेच पडके जुने घर, भिजलेली भिंत, सामायिक भिंतीला तडे असे दिसून आल्याने जवळपास ८५ जणांना नोटिसा दिल्या आहेत. शनिवारी एका ठिकाणी सील करण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी सांगितले.
गंजगोलाईत दोन ठिकाणी कारवाई...मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या सूचनेनुसार गंजगोलाई भागात, बाजारपेठेत धोकादायक आढळून आलेल्या ४५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा गंजगोलाईतील दोन ठिकाणी तात्काळ सील करण्यात आले आहे. तसेच शेजारच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, जुन्या घरातील लोकांनी पावसाळ्यात किमान चार महिने इतर ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असे कळविण्यात आल्याचे क्षेत्रीय अधिकारी पवन सुरवसे यांनी सांगितले.
जीर्ण इमारतीचा शेजाऱ्यांना धोका...गंजगोलाईत बाजारपेठेत अनेक जुन्या धोकादायक इमारती आहेत. अनेकांचे बांधकाम १०० वर्षापूर्वीचे आहे. ज्यांच्यामुळे शेजाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशी स्थिती आहे, अशा ठिकाणी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. भिज पाऊस सतत राहिल्यास भिंतीत पाणी मुरून धोका वाढू शकतो, अशी भिती नागरिकांतून व्यक्त होत आहे.