उदगीर (जि.लातूर): शहरालगत असलेल्या दत्तनगर मादलापूर येथील एका महिलेचा मंगळवारी दुपारी बनशेळकी तलावात मृतदेह आढळला होता. मात्र, सोबतच्या दोन मुलांचा शोध लागत नसल्याने अग्निशामन दलाने तलावात शोध घेतला असता बुधवारी दुपारी ३ वर्षीय मुलगी व ९ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आहे.
दत्तनगर भागातील मनीषा गौतम शिरसाट (२९) ही मंगळवारी मुलांचे आधार कार्ड काढायचे आहे म्हणून घरी सांगून सोबत दोन्ही मुलाला घेऊन घराबाहेर गेली होती. मंगळवारी दुपारी त्या महिलेचा मृतदेह उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी तलावात आढळून आला होता. तेव्हापासून उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक व उदगीर नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी मुलाच्या शोधात लागले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले सापडली नव्हती.
बुधवारी सकाळी १० वाजता पुन्हा त्या बालकांचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दलाच्या पथकाने सुरुवात केली. दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृतदेह आढळून आला व ५ वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह तलावातच सापडला. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन यांनी भेट दिली. शोध मोहिमेत उदगीर नगरपालिकेतील अग्निशामक दलाचे विशाल आल्टे, संजय क्षीरसागर , सुरेश उप्परबावडे, उमाकांत गंडारे, रत्नदीप पारखे, उत्कर्ष कांबळे, नरसिंग अंधारे, अखिल शेख, शादाब हाशमी यांचा सहभाग होता. तसेच ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस उपनिरीक्षक तानाजी चोरले यांनी घटनास्थळी पाहणी केली.