राजकुमार जाेंधळे
लातूर : शहरातील विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यातील पाेलिस हेड काॅन्स्टेबल पांडुरंग शंकरराव पिटले (वय ५०) यांनी गांधी चाैक ठाण्यात लाॅकअप गार्ड म्हणून शुक्रवारी रात्री कर्तव्यावर असताना डाेक्यात गाेळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या पिटले यांना मध्यरात्री उशिरा रुग्णालयात दाखल केले हाेते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. अखेर साेमवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर जिल्हा पाेलिस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी डीवायएसपी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माेकाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
पीरपाशावाडी गावचे मूळचे रहिवासी...निलंगा तालुक्यातील पीरपाशावाडी येथील मूळचे रहिवासी आहेत. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असून, शिक्षणानंतर त्यांनी पाेलिस दलात दाखल झाले. जवळपास दाेन दशकांपेक्षा अधिक त्यांनी आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, अंत्यविधीला पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घटनेमागील कारण अजूनही अस्पष्ट...पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे म्हणाले, स्वत:वर गोळी झाडून घेण्यापूर्वी पिटले यांनी कोणती चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळली नाही. कोणावर आरोपही केलेले नव्हते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचा जबाब घेता आलेला नाही. परिणामी, घटनेमागील कारण अस्पष्ट असून, तपास सुरू आहे.