जळकोट (जि. लातूर) : वाळत असलेल्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या एका उच्चशिक्षित तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील बोरगाव (खु.) येथे शुक्रवारी घडली.
बोरगाव (खु) येथील शेतकरी मोहन केंद्रे यांचा मोठा मुलगा सुनिल केंद्रे (वय २६) पुण्यात एम.कॉमचे शिक्षण घेतो. लक्ष्मी व गणेश उत्सवाच्या सुट्ट्या असल्याने तो गावाकडे आला होता. मात्र, मागील महिनाभरापासून पाऊस नसल्याने पिक वाळत असल्याचे पाहून तो हताश झाला. विहिरीला पाणी असल्याने वडिलांना घेऊन तो शेतात आला.
पाण्याची मोटार सुरू करून पिकाला पाणी देण्यासाठी सुरू केली असता मोटारीने पाणी ओढले नाही. मोटार पाणी का ओढत नाही, म्हणून सुनिल विहिरीत उतरून फुटबॉल पाहत होता. मात्र, याचवेळी पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने त्याला विजेचा धक्का बसला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान, भाऊ असा परिवार आहे.