हाळी हंडरगुळी : राज्यातील १९४ पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी असून, २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड आहे. त्यामुळे तात्काळ दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयाची मदत करावी, उपाययोजना राबवाव्यात, सरसकट पिक विमा मंजूर करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथे शुक्रवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतीचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शंभर टक्के अनूदानावर तारेचे कुंपन द्यावे, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे व जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास पाटील, बाळासाहेब शिवशेट्टे, उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, जळकोट तालुकाध्यक्ष महेश देशमुख, जब्बार तांबोळी, शहराध्यक्ष संतोष भोपळे आदींसह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.