लातूर : ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी सकाळपासून लातूर- जहिराबाद महामार्गावरील मसलगा (ता. निलंगा) येथे छावा संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास साळुंके व माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. लातूर- जहिराबाद महामार्गालगतच्या गावांत जाण्यासाठी रस्त्यांचे अर्धवट काम राहिल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे काही जणांचा बळी गेला आहे. ही अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करावीत. महामार्गालगत प्रत्येक गावाच्या बाजूस बसथांबा तयार करण्यात आला आहे. परंतु, तिथे प्रवाशांना थांबण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. ती उपलब्ध करावी.
प्रत्येक गावाजवळील पथदिवे सुरु करावेत. अर्धवट कामामुळे अपघात होऊन मयत झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून ५ लाख द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी हे रास्तारोको आंदोलन सुरु आहे. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित आहेत. आंदोलनस्थळी जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.