औसा : मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविली असून, खरीपातील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, २५ टक्के पिकविमा अग्रीम देण्यात यावा, या मागणीसाठी औसा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील साई चौकात शिवसेनेच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पावसाळा हंगाम संपत आला तरीही नदी, नाले, पाण्याचे स्त्रोत कोरडेच आहेत. पावसाची उघडीप असल्याने खरीपातील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे वर्ष कसे काढणार असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, २५ टक्के आग्रीम द्यावा, शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा करावा, चारा छावण्या उभाराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात माजी आ. दिनकरराव माने, जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, बजरंग जाधव, जयश्री उटगे, श्रीपाद कुलकर्णी, तानाजी सुरवसे, संजय उजळंबे, सचिन पवार आदींसह पदाधिकारी सहभागी होते.