लातूर : लातूर जिल्ह्यात १८९ सोयाबीनच्या नमुन्यांपैकी १२८ नमुने अप्रमाणित निघाले असून, यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुबार व तिबार पेरणी करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. असे असतानाही कृषी विभागाने अप्रमाणित बियाणासंदर्भात कंपन्यांवर खटले दाखल करण्यास विलंब केला आहे. ९५ खटल्यांपैकी केवळ १४ प्रकरणे न्यायालयात दाखल केली असून, अन्य ८१ प्रकरणे प्रलंबित आहेत.शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या व न उगवलेली १८९ सोयाबीनचे नमुने लातूरच्या कृषी विभागाने ताब्यात घेतले. त्यापैकी १२८ नमुने अप्रमाणित निघाले. यातील न्यायालयीन दावा दाखल करण्यास ९५ नमुने पात्र आहेत. परंतु, कृषी विभागाने न्यायालयात केवळ १४ नमुनेच दाखल केले आहेत. उर्वरित ८१ सोयाबीनच्या नमुन्यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला नाही. ९५ नमुने न्यायालयीन दाव्यास पात्र असताना कृषी विभागाने मात्र १४ प्रकरणेच दाखल केली आहेत. उर्वरित ८१ नमुन्यांबाबत वेळकाढूपणाकेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. खरीप हंगाम संपून रबी हंगामातील बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तरीही कृषी प्रशासनाने खरीपातील सोयाबीनच्या नमुन्यांबाबत वेळकाढूपणा केल्याचे दिसते आहे. लातूर शहरात उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी विभागीय कृषी कार्यालय आहे. या जिल्ह्यांतही न्यायालयीन प्रकरणे पात्र असताना ती दाखल केली नाहीत. उस्मानाबादमध्ये ५३, नांदेडमध्ये १०२, परभणीमध्ये ४२ आणि हिंगोली जिल्ह्यात ७२ सोयाबीनच्या नमुन्यांसंदर्भात न्यायालयात दावा दाखल करण्यात आलेला नाही. विभागीय आयुक्तांकडून अहवाल आल्यानंतर या महिन्याच्या अखेरपर्यंत दावे दाखल केले जातील. शिवाय, संबंधित कंपन्यांना ताकीद देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांंना या बियाणासंदर्भात नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यामुळे विलंब झाला असल्याचे कृषी सहसंचालक के.एन. देशमुख यांनी सांगितले. लातूर विभागात एकूण ७८४ सोयाबीनच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६११ अप्रमाणित नमुने निघाले आहेत. न्यायालयीन दाव्यास पात्र असणाऱ्या नमुन्यांची संख्या ४८४ होती. त्यापैकी १३४ न्यायालयात प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. उर्वरित ३५० प्रकरणे अद्याप दाखल करण्यात आली नाहीत. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी सहसंचालक देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)उत्पादक, विक्रेत्यांना अप्रमाणित निघालेल्या बियाणासंदर्भात ताकीद देण्यात आली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल. न्यायालयातही अप्रमाणित सर्वच नमुन्यांबाबत दावा दाखल करण्यात येणार आहे, असेही कृषी सहसंचालक के.एन. देशमुख यांनी सांगितले.कमी पावसामुळे सोयाबीनचा उतारा यंदा घटला असून, सुरुवातीपासूनच या पिकावर संकट आले. शिवाय, पेरणीतच बियाणे अप्रमाणित निघाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला.
खटले दाखल करण्यास विलंब
By admin | Published: November 16, 2014 11:31 PM