कासारशिरसी : निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शहरातील वाहनांची रहदारी कमी करण्यासाठी शहराला बाह्यवळण रस्ता मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
औसा विधानसभा मतदारसंघात असलेल्या कासारशिरसी येथे बाजारपेठ असल्यामुळे सतत रेलचेल असते. त्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी शहरासाठी बाह्यवळण रस्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मंजूर करुन घ्यावा. रामलिंग मुदगड, कासारशिरशी शिवारातून उमरगा, निलंगा राज्य मार्गाला जोडला जाणारा ५ किलोमीटरचा पाणंद रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा पाणंद रस्ता दुरुस्त करण्यात यावा, याविषयी दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते.
बाह्यवळण रस्त्यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार आहे. शिवाय नारंगवाडी, नाईचाकूर, मदनसुरी, रामलिंग मुदगड येथून ये-जा करणाऱ्या वाहनांची उमरग्याला जाण्यासाठी सोय होणार आहे. तसेच गंभीर आजारी रुग्णांना कासारशिरसी येथे न येता थेट ग्रामीण रुग्णालयात नेणे सोपे होईल. भविष्यात होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी हा बाह्यवळण रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मोहिमेंतर्गत उमरगा रोड ते रामलिंग मुदगड रोड हा कासारशिरसीचा बाह्यवळण रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.