रेणापूर (जि़ लातूर): रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी रेणापूर तहसील कार्यालयासमोर लातूर ग्रामीण युवक काँग्रेस व विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लालासाहेब चव्हाण, लातूर ग्रामीण युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमर वाकडे, विश्वनाथ कागले, प्रदीप काळे, विलासराव देशमुख युवा मंच शहराध्यक्ष सचिन पुंडलिकराव इगे, माजी सभापती प्रदीप राठोड, जिल्हा महासचिव प्रमोद कापसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश सूर्यवंशी, संचालक प्रकाश सूर्यवंशी, व्ही.एस. पँथर्सचे तालुकाध्यक्ष अजय चक्रे, प्रशांत माने, नगरसेवक रामलिंग जोगदंड, भूषण पनुरे, सेवा दलचे तालुकाध्यक्ष हणमंत पवार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पवार, लातूर ग्रामीण युवक काँग्रसचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, बाळासाहेब गरड आदी सहभागी झाले होते़
पीकविमा न भरलेल्या सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे़ लातूर जिल्हा प्रमुख मार्ग क्र. ३ या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून ते पुन्हा करण्यात यावे. लातूर- अंबाजोगाई रोडवरील कोळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दत्त मंदिर देवस्थानास रस्ता मंजूर करण्यात यावा़ चार वर्षांपासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही़ ती तात्काळ देण्यात यावी़ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या़ या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले़
जोरदार घोषणाबाजीत अर्धा तास आंदोलनहे आंदोलन अर्धा तास करण्यात आले़ दरम्यान, जोरदार घोषणा देण्यात आल्या़ शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना मासिक १० हजार आर्थिक मदत द्यावी़ २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी़ शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान द्यावे़ ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करावे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत प्रवास पास द्यावा,अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या़