मांजरा नदीवर लातूर तालुक्यात साई बॅरेज आहे. गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतीतून अधिक उत्पादन काढण्यासाठी बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस, फळबागा तसेच भाजीपाल्याची लागवड केली आहे. सध्या मे महिना असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे कोरडे पडत आहेत. परिणामी, बॅरेजमधील पाण्याने तळ गाठला आहे. या बॅरेज परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टीपोटीची रक्कम भरणा केली आहे. परंतु, पाटबंधारे विभागाकडून बॅरेजमध्ये पाणी सोडण्यात येत नाही. परिणामी, उसासह फळबागा, भाजीपाला वाळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्याने युवा सेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याची मागणी करीत निवेदन दिले आहे. त्यावर तसेच अशोक पवार, ज्ञानेश्वर पवार, मनोहर पवार, संजय जगताप, हरिकिशन पवार, बळीराम पांडे, श्रीमंत पवार, गुरुनाथ स्वामी, काशिनाथ स्वामी, वसंत मिटकरी, शिवाजी मिटकरी, रामराव पवार, शामराव पवार, जीवन सूर्यवंशी, बाळू स्वामी, विष्णू पवार यांनीही निवेदन देऊन पाणी मागणी सोडण्याची मागणी केली आहे.