राजकुमार जाेंधळे / लातूर : पशुधनांच्या बाजारासमाेवर म्हशींचा टेम्पाे अडवून पाच हजारांची खंडणी मागितल्याची घटना कव्हा नाका परिसरात शनिवारी घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना पाेलिसांनी अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील कव्हा नाका परिसरात असलेल्या पशुधनांच्या बाजारात एका छाेटा हत्ती टेम्पाेतून म्हशींची विक्री करण्यासाठी आणण्यात येत हाेते. दरम्यान, शनिवारी बाजाराच्या प्रवेशदारावर सात ते आठ जणांनी शिवीगाळ करुन टेम्पाे अडविला. जनावराचे व्यापारी अंकूश हरी बनसाेडे (वय ४५, रा. भाेयरा ता. लातूर) यांना पाच हजार रुपयांची खंडणी दे नाहीत तर तुला बाजारात जनावरे विक्री करुन देणार नाही, असे म्हणून धमकावले. शिवाय, जबरदस्तीने दाेन हजार रुपये काढून घेतले. तर इतर एका व्यापाऱ्यालाही धमकावत खंडणीची मागणी केल्याचाही प्रकार घडला आहे.
याप्रकरणी गांधी चाैक पाेलिस ठाण्यात व्यापारी अंकूश बनसाेडे यांच्या तक्रारीवरुन शनिवारी युवराज बावरी, बलदेव बावरी, शिवा बावरी, पवन खिच्ची (रा. वीर हनुमंतवाडी, लातूर), चंद्रकांत साळुंके (रा. कातपूर रोड, लातूर), अनिल जाधव (रा. मोतीनगर, लातूर) आणि सागर कतारी (रा. सोलापूर) यांच्यासह इतर एका अनाेळखीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक केली आहे, असे तपासाधिकारी पाेलिस उपनिरीक्षक डी.एन. काळे यांनी सांगितले.