लातूर : मराठवाडा विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील पशुसंवर्धनातील अडचणी दूर व्हाव्यात, दुग्धव्यवसाय वाढीला लागावा, यासाठी लातूर येथे मंजूर झालेल्या स्वतंत्र विभागीय पशुरोगनिदान प्रयोगशाळा स्थापनासाठी ११ पदमान्यतेचा शासननिर्णय जाहीर झाला आहे. लवकरच ही प्रयोगशाळा कार्यान्वीत होणार असून, यासाठी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी पाठपुरावा केला आहे.
आ. धीरज देशमुख यांच्या मागणीनुसार माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी लातूर येथे विभागीय पशुरोगानिदान प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला होता. १३ जून रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत लातूर येथे विभागीय पशुरोगनिदान प्रयोगशाळा स्थापण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. याबाबत शासन निर्णय झाल्याने प्रयोगशाळा प्रत्यक्ष सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
यापूर्वी मराठवाड्यातील पशुपालकांना पशुपक्षांमधील रोगनमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे येथील प्रयोगयशाळेवर अवलंबून रहावे लागत होते. पशुरोगाचे निदान होण्यास वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. लातूर येथे आता ही प्रयोगशाळा स्थापन होत असल्याने लातूर, धाराशीव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी उच्च दर्जाची अत्याधुनिक पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. रोगनिदानाचे काम गतीने, वेळेत होणार आहे. यामुळे पशुधन आणि पक्षांत होणाऱ्या रोगाप्रादूर्भावर नियंत्रण करता येणार आहे.
इमारत उभारणीसाठी अडीच काेटींचा खर्च...या कार्यालयाच्या इमारत उभारणीसाठी २ कोटी ५१ लाखाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट-अ (संख्या २), पशुधन अधिकारी गट - अ, सहायक पशुधन विकास अधिकारी गट-क, पशुधन पर्यवेक्षक गट-क, कनिष्ठ लिपीक गट-क, प्रयोगशाळा सहाय्यक गट-क, वाहन चालक गट-क, परिचर गट-क (संख्या ३) अशा एकूण ११ पदाला मंजुरी मिळाली आहे.