उदगीर : महसूल विभागाच्यावतीने शेतकऱ्यांच्या ७/१२ वर पिकांची नोंदणी करण्यासाठी ई-पीक प्रणाली व प्रात्यक्षिक आदी माहिती देण्यासाठी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी बुधवारी सहकाऱ्यांसह तालुक्यातील देवर्जन येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात मार्गदर्शन केले.
ई-पीक पाहणी प्रणालीचा वापर करून आपल्या पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले. तसेच ई-पीक पाहणी नोंदणी प्रणालीत शेतकऱ्यांनी बांधावर थांबून फोटोसह पिकाचे नाव अपलोड केल्यानंतर संबंधित क्षेत्रावर त्या पिकाची नोंद दिसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्याकडे पीक नोंदणी प्रमाणपत्रासाठी जाण्याची गरज नाही. शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांना या प्रणालीचा फायदा मिळत असल्याचे उपजिल्हाधिकारी मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले. यावेळी मंडल अधिकारी पंडित जाधव, तलाठी आकाश आलुरे, अमोल गव्हाणे, वीरभद्र धोत्रे, विनोद रोडगे, गुरुबस बर्गे, भीमा रोडगे, नागनाथ स्वामी, राजकुमार धोत्रे, सोमनाथ पाटील, सतीश जवळगे, शिवराज केसाळे आदी उपस्थित होते.