लातूर : जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा ३४.६ मि.मी. पाऊस अधिक झाला असला, तरी जिल्ह्यातील अनेक मध्यम आणि लघु प्रकल्प जोत्याखालीच आहेत. १३२ पैकी फक्त ४६ लघु प्रकल्प भरले असून ८ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ २ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी सगळीकडे सारखा पाऊस न झाल्यामुळे तब्बल ९४ प्रकल्पांमध्ये अद्याप जोत्याखालीच पाणी आहे.
जिल्ह्यात १३२ लघु प्रकल्प आहेत. त्यातील चिंचोली जोगण, कार्लातुंगी, सारोळा, येल्लोरी, खुंटेगाव, पिंपरी, गुरधाळ, निडेबन, दवणहिप्परगा, गुडसूर कोनाळी, चांदेगाव, धसवाडी, सोनखेड, कोपरा किनगाव, कौडगाव, येस्तार, येलदरी, ढाळेगाव, हगदळ-मुगदळ, अहमदपूर, अंधोरी, उगिलेवाडी, सावरगाव थोट, हंगेवाडी, बोकणी, दवणहिप्परगा, दरेवाडी (क), वडमुरंबी, गुरनाळ, आनंदवाडी, लासोना, ढोरसांगवी, हावरगा, धोंडवाडी, सोनाळा, डोंगरगाव, गुत्ती क्र. १, २, नागलगाव, नागदरी, नागझरी, रावणकोळा, माळहिप्परगा, चेर क्र. २, डोंगरकोनाळी आदी ४६ लघु प्रकल्प भरले आहेत.
जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ६९३ मि.मी. आहे. सरासरीपेक्षा ३४.६ मि.मी. अधिक पाऊस झाला आहे. म्हणजे आतापर्यंत ७२७.६ मि.मी. पाऊस झाला आहे. देवणी तालुक्यातील देवणी, बोरोळ, वलांडी, उदगीर तालुक्यातील मोघा, रावणगाव, हेर आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, पानचिंचोली, भूतमुगळी, औसा तालुक्यातील औसा, किनीथोट आणि भादा या अकरामहसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी अर्थात ढगफुटी झाली होती. अन्य महसूल मंडळांत मात्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सगळीकडे सारखा पाऊस न झाल्याने अनेक मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी साठा जोत्याखाली आहे.
आठ मध्यम प्रकल्पांपैकी देवर्जन आणि साकोळ १०० टक्के भरले आहेत. मसलगा प्रकल्प ७५ टक्के भरला असून, घरणी ४७.४९, तिरु ४२.५०, रेणापूर २४.४७ टक्के भरला आहे. तावरजात अद्यापही शून्य टक्के पाणीसाठा आहे.