अहमदपूर तालुक्यातील देवकरा हे छोटेसे गाव आहे. गावास वीजपुरवठा होणारा विद्युत डीपी आठ दिवसांपूर्वी जळाला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी तो दुरुस्त करण्यात यावा; अथवा नवीन बसविण्यात यावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे; परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गावचा वीजपुरवठा बंद असल्याने गावास नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच पावसाचे पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती नाकारता येत नाही.
शासनाने रॉकेलचे वितरण बंद केल्याने गावातील नागरिकांना गोडेतेलाचे दिवे लावावे लागत आहेत, तसेच मोबाइल चार्जिंगसाठी बाहेरगावच्या नातेवाइकांचा आधार घ्यावा लागत आहे. महावितरणने त्वरित नवीन विद्युत डीपी बसवावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही.