कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे छोट्या- मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले होते. दरम्यान, शासनाने सदरील काळातील वीजबिल काही प्रमाणात माफ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ग्राहकांना वीजबिल माफ होण्याची प्रतीक्षा होती. परिणामी, बहुतांश ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे वीजबिले थकीत राहिली.
दरम्यान, शासनाने वीजबिलात सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. थकीत वीजबिलाचा भरणा न केल्यास महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, शहरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सकाळपासूनच वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीजबिल न भरल्यास दोन ते तीन दिवसांत वीज कनेक्शन तोडले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
१८ लाखांची वसुली...
थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. एक महिन्यापासून वीजबिल वसुली सुरू असून महिनाभरात १८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. शहरात अजूनही एक कोटी रुपयांची थकबाकी आहे, असे महावितरणचे शिवशंकर सावळे यांनी सांगितले.