रेणापूर : येथील तहसील कार्यालयासमोर दिव्यांग आधार संघाच्या वतीने विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, विविध मागण्यांसाठी यापुर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यावर निर्णय न झाल्याने अध्यक्ष दिपमाला तुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आंदोलन करण्यात आले.
शहरी व ग्रामीण स्तरावर दिव्यांगासाठी पाच टक्के निधी तात्काळ मिळावा, दिव्यांग प्रमाणपत्रसाठी होणारा विलंब टाळून दिव्यांगाना प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, पिवळे शिधापत्रिका विनाशर्त व कोणतेही शुल्क न आकारता देण्यात यावे, दिव्यांगांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात पोहरेगावचे माजी सरपंच गंगसिंह कदम यांनी पाठिंबा देऊन सहभाग घेतला. याप्रसंगी सचिव मनीषा मुटकुळे, कोषाध्यक्ष काकासाहेब शिंदे, सहसचिव बाळू मस्के यांच्यासह तालुक्यातील व लातूर येथील संघटनेचे पदाधिकारी, दिव्यांग बांधव सहभागी झाले होते