अहमदपूर : शहरातील बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. तेथील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने ये- जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने खड्ड्यांस फुलांचा हार घालून सोमवारी आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील, अजय तुपकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष नारागुडे, चेअरमन मदन पलमटे, चंद्रकांत सांगुळे, गजानन पांगरे, सतीश करपुडे, शिवराज कासले, लक्ष्मण भदाडे, बाबुराव लांडगे, व्यंकट गायकवाड, मनोज पाटील, बाबाराव आढाव, व्यंकट कदम, मनोज पाटील, उद्धव कदम, रितेश आढाव, गोविंद आढाव, उद्धव गायकवाड आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे घाण पाणी तिथे साचत आहे. परिणामी, दुर्गंधी पसरत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. ही समस्या दूर करावी तसेच स्थानकास संरक्षण भिंत बांधावी. स्वछता कर्मचाऱ्यांकडून दररोज स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक सतीश बिलपट्टे, बसस्थानक प्रशासनाचे कोकाटे यांनी लवकरच समस्या दूर करण्यात येतील, असे सांगितले.