लातूर: सालगड्याच्या खूनप्रकरणी लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शेतमालकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये एकूण ९ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरली आहे. औसा तालुक्यातील बोरफळ येथे २७ मे २०२१ रोजी गोविंद राम यादव (वय ३८, रा. बोरफळ) हे शेतमालक आरोपी नितीन महादेव सुगावे (रा. बोरफळ) याच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. सालगडी म्हणून ठरविण्यात आलेले पैसे न दिल्यामुळे सालगडी घरी बसून होते. २८ मे २०२१ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी नितीन सुगावे याने मयताची पत्नी व चुलत भावाच्या समक्ष गोदविंद यादव यास तू कामवर चल, तुला पैसे देतो असे म्हणून त्याच्यासोबत शेताला घेऊन गेला. त्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली सकाळी ११.५० वाजता सालगडी म्हणून ठरलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरुन काठीने मारहाण करुन, त्याचा खून केला.
याबाबत औसा पोलीस ठाण्यात गुरनं. १५८ / २०२१ कलम ३०२ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक एन.आर. गायकवाड यांनी तपास करुन लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश आर.बी. राटे यांच्या न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. दरम्यान, सरकार पक्षाच्यावतीने एकूण ९ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.
फिर्यादीची साक्ष, रासायनिक विश्लेषण अहवाल आणि भारतीय पुरावा कायदा कलम २७ अन्वये केलेला जप्ती पंचनामा हा ग्राह्य धरुन, त्याचबरोबर बचाव पक्षाने घेतलेला बचाव संयुक्तिक न वाटल्याने आरोपी नितीन महादेव सुगावे यास कलम ३०२ भादंविप्रमाणे दोषी ठरवत जन्मठेप आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी काम पाहिले. तर त्यांना समन्वयक, पैरवी अधिकारी पोलीस हलवालदार आर.टी. राठोड, पैरवी अधिकारी महिला पोलीस अंमलदार विजया पकाले, लिपीक दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले.