- महेश पाळणेलातूर : पॅरी ॲटॅकने प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमक खेळाद्वारे छाप पाडणाऱ्या अहमदपूरच्या ज्ञानेश्वरी शिंदेने तलवारबाजीत धारदार कामगिरी केली आहे. लंडन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आहे.
मूळची अहमदपूरची असणारी तथा शिरूर ताजबंदच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ज्ञानेश्वरी माधव शिंदेने कटक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. राष्ट्रीय स्पर्धेतील या कामगिरीबद्दल तिची आता भारतीय संघात निवड झाली आहे. आक्रमक खेळ, उत्कृष्ट पॅरीॲटॅक या तिच्या जमेच्या बाजू असून, या जोरावर तिने अनेकवेळा राज्य व राष्ट्रीय पातळीवर पदके पटकाविली आहेत. घरची परिस्थिती साधारण असताना तिने मिळविलेले हे यश उल्लेखनीय आहे. तिला प्रशिक्षक वजिरोद्दीन काझी, मोहसीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे कौतुक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते दत्ता गलाले, प्रा. अभिजीत मोरे, वैभव कज्जेवाड, रोहित गलाले, बबलू पठाण, आकाश बनसोडे व जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा...यापूर्वी ज्ञानेश्वरीने दोनवेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. थायलँड येथे झालेल्या १४ वर्षे वयोगटातील चिल्ड्रन्स वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच पोलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिचा भारतीय संघात समावेश होता.
राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकेसंघटनेमार्फत आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील तिचा सातवेळा सहभाग असून, चारवेळा तिने पदकप्राप्त केले आहे. यासह राज्य स्पर्धेत तिला आजतागायत ३० पदके आहेत. त्यात १० सुवर्ण, ५ रौप्य तर १५ कांस्य पदकांचा समावेश आहे.