जळकोट (जि. लातूर) : समाजात तेढ निर्माण होऊ देऊ नका, जातीयवाद बाजूला सारा, आरक्षणासाठी मराठ्यांनी जागे व्हावे, एकजूट फुटू देऊ नका. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश न केल्यास सरकारला पुढील आंदोलन जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येथे दिला.
नांदेड-जळकोट सीमेवरील जांब-जळकोट येथे मनोज जरांगे-पाटील यांची सभा शनिवारी दुपारी ४ वाजता पार पडली, यावेळी ते बोलत होते. प्रारंभी जांब चौक ते सभेच्या ठिकाणापर्यंत मनोज जरांगे-पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून, जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. तसेच जांब-जळकोट येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे शिवाजी मोरे, श्याम शिंदे, दिलीप मोरे, दिनेश मोरे, शिवशंकर लांडगे, मारुती जाधव, मुक्तेश्वर येवले, संदीप बिरादार, संतोष पवार, मारुती डावळे यांच्या हस्ते जरांगे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोज जरांगे-पाटील म्हणाले, आरक्षणाचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ३५ लाख मराठा बांधवांना आरक्षण मिळाले आहे. नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये आरक्षणाच्या नोंदी कमी सापडल्या आहेत. संबधित अधिकाऱ्यांनी तातडीने नोंदी शोधाव्यात, अशा सूचना शासनास केल्या असल्याचेही ते म्हणाले. २४ डिसेंबरला मराठा आरक्षण व ओबीसीमध्ये समावेश करण्याबाबत सरकारने शब्द दिला आहे. तसा त्यांनी कायदा पारित करावा, मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे. जर आरक्षण जाहीर नाही केले तर शासनाला मराठा समाजाचे आंदोलन जड जाईल, असेही मनोज जरांगे-पाटील म्हणाले.
आरक्षणाशिवाय एक इंचही मागे सरकणार नाही...मराठा आरक्षणासाठी आपण शांततेने लढा सुरू ठेवणार आहोत. गावे पिंजून काढा, मराठा समाजबांधवांनो, जागे व्हा! मला बळ द्या, आशीर्वाद द्या! मरण आले तरी आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी एक इंचही मागे सरकणार नाही, असे भावनिक आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी सभेत केले. यावेळी श्रीकांत सूर्यवंशी, व्यंकट मोरे, शिवाजी मोरे, श्याम शिंदे, दिनेश मोरे, संतोष पवार, संतोष पवार, सभापती विठ्ठल चव्हाण, ॲड. श्रीनिवास मनाले, दिगंबर भोसले, संजय माने आदींसह सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.