लातूर : शासनाच्या मदतीशिवाय स्वत:ची काही जमीन विकून पशुधन वाचविण्यासाठी कवठा येथील शेतकरी विनायकराव पाटील यांनी मराठवाडास्तरीय जनावरांच्या चारा छावणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. २० मार्चपासून छावणी सुरू करण्यात येणार असून, पशुधन विकू नका, छावणीत आणून सोडा, मी त्यांचा सांभाळ करतो, असे आवाहन पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
राज्यात दुष्काळानेशेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. खरिपाची पिके गेली रबीची पेरणी झाली नाही. घरात माल नाही आणि खिशात पैसा नाही, जनावरांना चारा नाही. तरुण मुलांच्या हाती रोजगार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा सवाल उपस्थित करीत उमरगा तालुक्यातील कवठा येथील शेतकरी विनायकराव पाटील यांनी स्वत:च्या मालकीची जमीन विकून मराठवाडास्तरीय चारा छावणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी जनावरे न विकता या छावणीत आणून सोडावीत. असे आवाहन त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केले आहे. चारा छावणीमध्ये दररोज पोटभर चारा व एक किलो पशुखाद्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या गायी-म्हशींचे दूध स्थानिक डेअरीत देऊन त्याचे बिल पशु मालकांच्या नावावर काढण्यात येईल. दूर अंतरावरील शेतकरी किंवा सालगड्याची निवास-भोजनाची सोय करण्यात येणार आहे.
यापूर्वीही घर विकून चालविली चारा छावणीविनायक पाटील हे अखंडपणे समाजसेवा करीत असतात. स्वत: शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या दुखाची जाणीव आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे म्हणून ते नुसत्या समाजसेवेच्या गप्पा मारीत नाहीत किंवा कोणाच्याही दारासमोर मदतीसाठी जात नाहीत. आतापर्यंत त्यांनी समाजकार्याची सुरुवात स्वत:पासून केली आहे. करतात.मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पशुधन कसायाच्या दावणीला जाऊ नये याकरिता त्यांनी यापूर्वीही आपले स्वत:चे घर विकून २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये पशुधनासाठी चारा छावणी चालविली होती. २०१६ मध्येही स्वखर्चाने राज्यभरातील १ हजार शेतकऱ्यांना बियाणे व खताचे वाटप केले होते. आता त्यांनी मराठवाडास्तरीय चारा छावणीचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.