लातूर : कोरोनामुळे गेले काही दिवस रेल्वे सेवा बंद होती. आता काही रेल्वे सुरू झाल्या असून, लातूरहून जाणाऱ्या पंढरपूर-निजामाबाद, परळी-मिरज पॅसेंजर बंदच आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, या पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. सध्या लातूर-मुंबई, कोल्हापूर-धनबाद, हैदराबाद-हडपसर, नांदेड-पनवेल, कोल्हापूर-नागपूर या रेल्वे सेवा सुरू आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
लातूर-मुंबई
कोल्हापूर-धनबाद
हैदराबाद-हडपसर
नांदेड-पनवेल
कोल्हापूर-नागपूर
बंद असलेल्या पॅसेंजर
पंढरपूर-निजामाबाद, परळी-मिरज या दोन पॅसेंजर बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
पॅसेंजर बंद का?
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी लातूरहून जाणाऱ्या पॅसेंजर बंद आहेत. इतर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. पॅसेंजर बंद असल्याने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे पॅसेंजर बंद का, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
पॅसेंजर बंदमुळे होतेय गैरसोय
कामासाठी पंढरपूर-निजामाबाद तसेच परळी-मिरज पॅसेंजरने जाणे-येणे सुरू असते. मात्र या रेल्वे बंद असल्याने गैरसोय होत आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याने या पॅसेंजर सुरू करण्यात याव्यात.
- अच्युत सोनवणे
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. बससेवाही पूर्ण क्षमतेने सुरू आहे. मग पॅसेंजरच बंद का? सर्वसामान्यांसाठी पॅसेंजर महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात याव्यात.
- मनोज जाधव
निर्णयाची प्रतीक्षा
लातूर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या दोन पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून होईल. त्यांच्याकडून होणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. आदेश मिळताच अंमलबजावणी केली जाईल.
- बी. के. तिवारी, रेल्वे स्टेशन प्रबंधक