लातूरमध्ये भाजपाचा बोलबाला; तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 09:38 PM2019-07-20T21:38:34+5:302019-07-20T21:39:53+5:30
सहा मतदारसंघातील चित्र; मोदी लाटेतही तीन मतदारसंघांवर काँग्रेसची पकड
- हणमंत गायकवाड
लातूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात तीन काँग्रेस आणि तीन भाजपा अशी समसमान सत्ता विभागणी आहे़ दरम्यान, लोकसभेतील प्रचंड मताधिक्याच्या विजयामुळे सध्या भाजपाचा बोलबाला असून तिकिटासाठी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
तूर्त उमेदवार कोण हे निश्चित नसल्याने भाजपात दिसणारे बाहूबळ प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात विखुरते की टिकते, हे पहावे लागणार आहे. तर काँग्रेसला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या निम्म्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यात लातूर शहर आणि निलंगा या दोन मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे़ निलंग्यातून विद्यमान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर भाजपाकडून मैदानात असतील. हा एकमेव मतदारसंघ असेल, जिथे भाजपाचा उमेदवार निश्चित आहे. आजोबा विरूद्ध नातू, काका विरूद्ध पुतण्या अशी लढाई झालेल्या निलंगा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष राहिले आहे. केंद्रात, राज्यात सत्ता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करून संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस लातूरहून रसद पोहोचविण्याची शक्यता आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, दिवंगत नेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा प्रदीर्घ काळ प्रभाव राहिलेल्या लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे कायम वर्चस्व राहिले.
२०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसने लोकसभेची जागा अडीच लाखांच्या फरकाने गमावली. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहा पैकी लातूर शहर, लातूर ग्रामीण व औसा या तीन विधानसभा मतदारसंघांवर विजय मिळविला होता. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेची गणिते वेगळी आहेत, असा अंदाज बांधून काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. लातूर शहरात माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख मोदी लाटेनंतरच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ४९ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. मात्र गेल्या पाच वर्षात भाजपाने मनपामध्ये सत्ता मिळविली. पालकमंत्र्यांनी शहरात लक्ष घातले आहे. त्यामुळे निलंग्यात जशी लातूरची रसद जाईल तसतशी निलंग्याची रसद लातूरला येईल, असा अंदाज आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा निवडून येत नाही, अशी परंपरा आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. विनायक पाटील आता अधिकृतपणे भाजपात आहेत.
जिल्ह्यातील इच्छुकांची एकूण गर्दी पाहिली तर त्यातील निम्मी गर्दी अहमदपूरच्या भाजपात आहे. त्यामुळे इच्छुक भाजप उमेदवारांची पहिली लढाई पक्षांतर्गत आहे. तिथे राष्ट्रवादी कडवे आव्हान देण्याच्या तयारीत आहे. उदगीरमध्ये सलग दोनदा विजय मिळविलेले भाजपाचे आ. सुधाकर भालेराव हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांनाही तिकिटासाठी संघर्ष करावा लागेल, असे आजचे राजकीय चित्र आहे. राखीव मतदारसंघ असलेल्या उदगीरमधून भाजपा विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होणार असली, तरी तिकीट वाटपात काँग्रेसही जागा मागत आहे. या सबंध लढाईत वंचित बहुजन आघाडी सर्वत्र उमेदवार उभारणीच्या तयारीला लागली असून, जिल्ह्यात अॅड. अण्णाराव पाटील यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली आहे.
औसा व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. बसवराज पाटील व आ. त्र्यंबक भिसे यांना भाजपा आव्हान देण्याच्या तयारीत आहे. औसा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी भाजपाने बांधणी केली आहे. लातूर ग्रामीणमध्येही पारंपरिक लढाई होते की काँग्रेस-भाजपा उमेदवार बदलणार यावर लवकरच फैसला होईल.
सर्वाधिक मोठा विजय-
लातूर शहर : आ. अमित देशमुख (काँग्रेस) ४९,४६५ (पराभव : शैलेश लाहोटी, भाजप)
सर्वात कमी मताधिक्याने पराभव
अहमदपूर : बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी) ४००६, (विजयी : विनायकराव पाटील - अपक्ष)