- राजकुमार जाेंधळेरेणापूर (जि. लातूर) : गिरीधारी तपघालेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात रेणापूर पोलिसांनी दिरंगाई केली असून, यातूनच ही घटना घडली आहे. आता यातील दोषी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहआरोपी करावे, तपघाले कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी, कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासनाची आर्थिक मदत मिळावी, आदी मागण्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पीडित तपघाले कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी भेटीदरम्यान केल्या. या सर्व मागण्यांबाबत आपण पाठपुरावा करणार असून, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा ॲड. आंबेडकर यांनी तपघाले कुटुंबाला दिला.
रेणापुरातील राजेनगर येथील तपघाले कुटुंबीयांना व्याजी पैशाच्या कारणावरून मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेले गिरीधारी केशव तपघाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजता पीडित तपघाले कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी भेदरलेल्या तपघाले कुटुंबाने आम्हाला सुरक्षा देण्यात यावी, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केली असून, त्यांना सहआरोपी करावे, अशी प्रमुख मागणी केली आहे.
यावेळी कमल गिरीधारी तपघाले, कलूबाई केशव तपघाले, अरुण तपघाले, सचिन तपघाले, ऋतिक तपघाले, योगेश तपघाले, विपुल तपघाले यांच्यासह औसा- रेणापूर उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, रेणापूर येथील तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, मंडळाधिकारी माणिक चव्हाण, तलाठी गोविंद शिंगडे, प्रभारी पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे-पाटील, मराठवाडा सचिव रमेश गायकवाड, जिल्हा महासचिव डॉ. तात्याराव वाघमारे, सलीम सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. विठ्ठल खोडके, रेणापूर तालुकाध्यक्ष गोविंद पंडगे, सुनील क्षीरसागर, रेणापूर शहराध्यक्ष उमाकांत रेणापुरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाजबांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.