लातूर : शेतमाल खरेदीच्या पैशावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ११ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. दरम्यान, व्यवहार पूर्ववत सुरु करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. परंतु, तिढा कायम राहिला. परिणामी, बाजार समितीने गुरुवारपासून खरेदीदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शेतीमालाचे व्यवहार पूर्ववत सुरु करावेत, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात लौकिक असलेल्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतमाल खरेदीच्या पैश्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सध्या शेतमालाची आवक कमी असली तरी दररोज जवळपास ६ ते ७ कोटी रुपयांची उलाढाल होत होती. यंदा वेळेवर खरीपाच्या पेरण्या झाल्याने पीक चांगले उगवले आहे. मात्र, काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी औषधांची फवारणी, कोळपणी, खुरपणी अशी कामे करीत आहेत. त्यासाठी पैश्याची आवश्यकता असल्याने घरातील सोयाबीनसह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. परंतु, बाजार बंद असल्याने शेतमाल कुठे विक्री करावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
११ दिवसांपासून तिढा सुटेना...पणन कायद्यानुसार शेतमाल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी २४ तासांच्या आत आडत्यांना पैसे देणे अपेक्षित आहे. या कायद्याचे पालन करण्यात यावे, असे पत्र बाजार समितीने काढले होते. तेव्हा खरेदीदारांनी पूर्वीप्रमाणे शेतमाल खरेदी केल्यानंतर नवव्या दिवशी धनादेश दिले जाईल, असे सांगितले होते. त्यावरुनच तिढा निर्माण झाला आहे. परिणामी, १ जुलैपासून शेतीमालाचा सौदा होत नाही. दरम्यान, बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास कार्यवाही...बाजार समितीत आलेल्या शेतमालाचा व्यवहार होणे आवश्यक आहे. मात्र, १ जुलैपासून खरेदीदार सौद्यात सहभागी होत नाहीत. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. बाजार सुरु करण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या. मात्र, त्यात तोडगा निघत नसल्याने अखेर गुरुवारपासून नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नोटिसा प्राप्त झाल्यानंतर २४ तासांत शेतमालाच्या लिलावात खरेदीदारांनी सहभाग न घेतल्यास परवाना निलंबित, रद्द करण्याचा बाजार समितीला अधिकार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.
६०० खरेदीदार...बाजार समितीत जवळपास ६०० खरेदीदार आहेत. या सर्वांना नाेटिसा बजावण्याची कार्यवाही सुरु आहे. सौद्यात सहभागी होण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे.- सतीश भोसले, प्रभारी सचिव.
आडत्याविना शेतमाल खरेदीस आम्ही तयार...अजून माझ्यापर्यंत नोटीस आली नाही. वैयक्तिकरित्या नोटिसा दिल्या जात असल्याचे समजले. लातूर बाजार समितीने राज्यातील इतर बाजार समितींप्रमाणे शेतमालाची थेट विक्री करण्यास सुरुवात करावी. आडत्यांच्या मध्यस्थीविना शेतमाल व्यवहारास आम्ही तयार आहोत. शेतमालाची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.- पांडुरंग मुंदडा, अध्यक्ष, खरेदीदार असोसिएशन.