लातूर : दुहेरी खून खटल्यामधील दाेघा दाेषींना शुक्रवारी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.बी. राेटे यांनी दुहेरी जन्मठेप आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात एकूण १३ साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.लातुरातील सुशीलादेवी नगर येथे दयानंद लटुरे यांच्या घरी, निशांत हरिभाऊ यादव (वय ४०) आणि नितीन हरिभाऊ यादव (वय ४४, दाेघेही रा. बाेरफळ ता. औसा) यांनी संगनमत करून, आराेपी निशांत यादवची पत्नी आणि त्यांच्या घरासमाेर भाड्याने राहणाऱ्या अशाेक शिवाजी राऊत या दाेघांचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याची घटना ९ नाेव्हेंबर २०१४ राेजी घडली. याबाबत मयताची पत्नी आशा अशाेक राऊत यांनी शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून निशांत यादव, नितीन यादव यांच्याविरुद्ध गु.र.नं. २११ / २०१४ कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पाेलिस निरीक्षक डी.डी. शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नाेंदविण्यात आली. खून खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष आणि डाॅक्टरांची साक्ष, इतर परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून लातूर जिल्हा व सत्र न्यायाधीश - १ आर.बी. राेटे यांनी आराेपी निशांत यादव आणि नितीन यादव यांस अश्विनी आणि अशाेक राऊत यांच्या खुनात दाेषी धरून दुहेरी जन्मठेप व एक हजार रुपयांची शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील संताेष देशपांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना समन्वयक, पैरवी अधिकारी, स.पाे.उप.नि. आर.टी. राठाेड, पाे.हे.काॅ. आर.एस. कडगे, ॲड. एम.के. बिरीकर, दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले.
लातूर जिल्ह्यात पहिलाच निकाल... -आजपर्यंतच्या खटल्यांमध्ये शुक्रवारचा हा निकाल आगळावेगळा ठरला आहे. दुहेरी खून खटल्यात एकापाठाेपाठ स्वतंत्र दाेनवेळा जन्मठेपेची शिक्षा आराेपीला भाेगावी लागणार आहे. आतापर्यंत लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. - ॲड. संताेष देशपांडे, लातूर