लातूर : काँग्रेस महाआघाडीतील घटक पक्ष प्रामाणिकपणे लढले तर सत्ता स्थापन करता येईल, अशी संख्या महाआघाडीकडे असेल, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. महाआघाडीमुळे भाजपाला पुढील निवडणूक अवघड जाईल. सत्ता स्थापन करता येईल, इतक्या संख्येने महाआघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात, असं चाकूरकर यांनी म्हटलं. खासदारांची संख्या दुप्पट करून महिलांनाआरक्षण देण्याची मागणी चाकूरकर यांनी केली. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसभा, राज्यसभेचे जितके सभासद होते, तितकेच आजही आहेत. १८ लाख लोकांमागे लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. तर ब्रिटनमध्ये ६० हजार लोकसंख्येमागे एक मतदारसंघ आहे. सबंध देशात लोकसभा, राज्यसभा व राज्यांची विधिमंडळे यांच्या सभासदांची एकूण सभासद संख्या ६ हजार आहे. एकंदर, लोकसभा व राज्यसभेच्या सभासदांची संख्या दुपटीने वाढवून महिलांनाआरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये लोकसभेचे कामकाज करावे. लोकसभेच्या दालनात राज्यसभेच्या सदस्यांसाठी जागा करता येईल. त्यामुळे संसदेच्या उपलब्ध जागेतच सर्वांची बैठक व्यवस्था होऊ शकते. आजची देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी वाढविण्याची गरज असल्याचेही चाकूरकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राफेलवरुन निर्माण झालेल्या वादंगावरदेखील भाष्य केलं. ५०० कोटींच्या राफेलची किंमत १६०० कोटी केली जात असेल तर संशयाला जागा आहे. त्याबद्दल करण्यात आलेल्या चौकशीच्या मागणीला सरकारने सामोरे गेले पाहिजे. काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, हा प्रश्न विचारणाऱ्यांनी अन्नसुरक्षा, रोजगार हमी आणि सर्वच क्षेत्रातील प्रगतीकडे पाहावे. काँग्रेसने जमीनदारी नष्ट केली. कायद्याचे राज्य आणले. राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण दिले, असेही चाकूरकर यांनी सांगितले. पक्षाचा आदेश असेल तर लढेन... लातूर लोकसभा राखीव मतदारसंघातून काँग्रेस तर उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी, असे सध्याचे जागा वाटप आहे. परंतु, उस्मानाबादमध्ये काँग्रेसकडून शिवराज पाटील चाकूरकर यांनी लढावे, अशी मागणी तेथील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून होत आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चाकूरकर म्हणाले, पक्षाने मला न मागता भरपूर दिले आहे. मी काही मागणार नाही. उभे राहण्याचा आदेश दिला तर लढेन. मित्रांत भांडणे लावू नका...चाकूरकर कुटुंबियातून विधानसभेला कोण, या प्रश्नावर चाकूरकर यांनी प्रतिप्रश्न केला, आता मतदारसंघही तुम्हीच सांगा. शेवटी ते म्हणाले, चर्चा घडवू नका. मित्रांत भांडणे लावू नका.
'खासदारांची संख्या दुप्पट करून महिलांना आरक्षण द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 8:34 PM