लातूर : लातूर जिल्हा परिषदेवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व असले तरी विषय समिती सभापती पदावरुन भाजपातील लिंगायत समाजाच्या पाच सदस्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे़ एकाही सभापतीपदी समाजातील एकाही सदस्यास स्थान देण्यात आले नाही, असे म्हणत शनिवारी या पाच सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे सामुहिक राजीनाम्याचे पत्र दिले आहे़ त्यामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे़
जिल्हा परिषदेत भाजपाचे ३५ सदस्य असल्याने निर्विवाद सत्ता आहे़ शनिवारी जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतींना खातेवाटप करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती़ तेव्हा भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, गटनेते महेश पाटील, बस्वराज बिरादार, उषा रोडगे, विजया बिरादार यांनी जिल्हा परिषदेतील सभापतीपदाच्या निवडीत कोअर कमिटीकडून लिंगायत समाजातील सदस्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला असल्याचे सांगितले़ लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदेतील सभापतीपदाबाबत कोअर कमिटीकडून समाजावर अन्याय होत आहे़ त्यामुळे सदस्यपदाचा राजीनामा देण्यासाठी आमच्यावर समाजाचा दबाव येत आहे़ सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सामूहिक राजीनामा देत असल्याचेही जिल्हाध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे़
पक्षाकडून विश्वासघात : महेश पाटीलअध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी तुमच्या समाजाच्या प्रतिनिधीस सभापतीपदावेळी प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले होते़ त्यामुळे समाजातील सदस्याने उमेदवारी अर्जही पक्षश्रेष्ठींकडे दाखल केला होता़ परंतु, ऐनवेळी हा अर्ज पीठासन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला नाही़ पक्षाने आमचा विश्वासघात केला आहे, अशी प्रतिक्रिया जि़प़ तील भाजपाचे गटनेते महेश पाटील यांनी दिली़
त्यांच्या समस्यांचे निरसण : रमेश कराडदरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड म्हणाले, सदस्यांनी राजीनामा दिला नाही़ त्यांच्या काही इच्छा, समस्या असतात़ त्याचे निरसण केले आहे़