लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गिरकचाळ येथील मांजरा नदीपात्रात बोटीच्या साहाय्याने वाळूचा उपसा करून अवैध साठा केल्याची घटना घडली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोखंडी बोट, तसेच अवैध वाळूचा साठा असा एकूण ६४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी सांगितले, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गिरकचाळ येथील मांजरा नदीपात्रात मोकळ्या जागेत वाळू बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला असता मांजरा नदीपात्रातून लोखंडी बोटीच्या साहाय्याने कोणाचीही परवानगी न घेता वाळूचा उपसा केला जात होता. यावेळी पोलिसांनी अंदाजे १ हजार ११० ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त केला. तसेच वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी बोट असा एकूण ६४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाळूचे अवैध उत्खनन, ५ जणांविरुद्ध गुन्हावाळूचे अवैध उत्खनन करून विनापरवाना चोरटी विक्री व्यवसायासाठी वाळू साठवणूक केली होती. याप्रकरणी भगवान भाऊराव शिंदे, भगवंत भाऊराव शिंदे, धनू बाबूराव शिंदे, शरद बाबूराव शिंदे, ईश्वर नागोराव शिंदे (सर्व रा. गिरकचाळ) यांच्याविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात कलम ३०३ (२), ३ (५) भा.न्या.सं. व कलम ४८ (७) ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्यांच्या शोधात आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाईस्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहायक पोलिस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलिस अंमलदार विनोद चिलमे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, सदाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख यांनी ही कारवाई यशस्वी केली.