जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनपणे बुधवारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, बांधकाम सभापती संगीताताई घुले आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष केंद्रे म्हणाले, आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा ठराव घेण्यात येऊन शासनाकडे तो लवकरच पाठवण्यात येईल.
सदस्य रामचंद्र तिरुके यांनी जिल्हा परिषदेने स्वतःचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारले. तसेच कोरोना सेंटरसाठी दोन कोटींचा पदाधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जमा केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सर्वांनी अनुमोदन दिले.
लसीकरणासाठी गर्दी टाळण्यासाठी टोकन द्यावे....
कोविड लसीकरणाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तथा गावपातळीवर लसीकरणासाठी नागरिक येत असल्याने होत असलेली गर्दी टाळण्यासाठी त्यांना टोकन देण्यात यावे, अशा सूचना केंद्रे यांनी आरोग्य विभागास केल्या.
जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविडसाठी निधी दिल्यानंतर केंद्रे यांनी सर्व पदाधिकारी, सदस्यांनी आपले एका महिन्याचे मानधन द्यावे, असा ठराव मांडला. त्यास सभापती गोविंद चिलकुरे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्यांनीही एक महिन्याचे मानधन देत आहोत असे सांगून या ठरावाला अनुमोदन दिले.
जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी जमा केलेल्या जवळपास दोन कोटींतून प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका, जनरेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदींसह आवश्यक साहित्य खरेदी करण्यात येईल, असे अध्यक्ष केंद्रे यांनी सांगितले. स्वयं शिक्षण प्रयोग संस्था या एनजीओमार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक हजार पीपीई किट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या.