लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या वतीने लातूर विभागात आता प्रवासीसेवा सुरु करण्यात आली आहे. याला प्रवाशांतून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सध्या चालक-वाहक मुंबईतील बेस्ट सेवेसाठी रवाना झाले आहेत. यातून लातूर विभागातील बसफेऱ्या घटल्या आहेत. परिणामी, दैनंदिन २० लाखांचा फटका सहन करावा लागत आहे. महामंडळाच्या लातूर विभागात लातूर उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा असे पाच आगार आहेत. यामध्ये एकूण अधिकारी, कर्मचारी, वाहक, चालकांची संख्या ३ हजार ५४ आहे. यापैकी चालक ९७० तर वाहकांची संख्या १ हजार ७१ आहे. पाच आगारांतील बससंख्या ४९० आहे. सध्या केवळ 3२१ बसेस धावत आहेत. यातून दररोज सरासरी ६०० फेऱ्या हाेत असून ३५ ते ४० लाखांचे उत्पन्न मिळत आहे. मुंबईतील बेस्टच्या सेवेसाठी लातूर विभागातून टप्प्या-टप्प्याने ४०० चालक, वाहक कर्तव्यावर रवाना हाेत आहेत. परिणामी, ४०० कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. यातून बसफेऱ्या अन् शटलसेवेवर परिणाम झाला आहे. काेराेनापूर्वी लातूर विभागातील बसेस १ लाख ६० हजार किलाेमीटर धावत असत. आता त्यात घट झाली असून, १ लाख ३० हजार किलाेमीटर धावू लागल्या आहेत. यातून ३०० बसफेऱ्या घटल्या आहेत.
४०० चाकल-वाहक मुंबईला झाले रवाना...
मायानगरी मुंबईतील लाेकल बंद असल्याने प्रवाशांना बेस्ट बससेवा देत आहे. त्यासाठी लातूर जिल्ह्यातील २०० चालक, २०० वाहक मुंबईला टप्प्या-टप्प्याने रवाना झाले आहेत. यातून लातूर जिल्ह्यातील शटल सेवेवर परिणाम हाेत आहे. ३० टक्के बसफेऱ्यांमध्ये घट झाली आहे. यातून दैनंदिन २० लाखांचा फटका सहन करावा लागत आहे. बसेस आहेत, प्रवाशांचा प्रतिसादही आहे. मात्र, चालक-वाहकांची कमतरता आहे.
लातूर विभागाचे उत्पन्न २० लाखांनी घटले...
मार्चपूर्वी लातूर विभागाचे दैनंदिन उत्पन्न सरासरी ५५ ते ६० लाखांच्या घरात हाेते. जवळपास ४५० बसेस वेगवेगळ्या मार्गावर धावत हाेत्या. एकूण ८५० ते ९०० बसफेऱ्या हाेत असत. त्यातून राेज ६० लाखांच्या घरात उत्पन्न हाेत हाेते. आता मात्र, ३२१ बसेस धावत असून, ६०० फेऱ्या हाेत आहेत. यातून केवळ ३५ ते ४० लाख उत्पन्न हाेत आहे. लातूर विभागाला दरराेज २० लाखांचा फटका सहन करावा लागत आहे.