लातूर : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत प्रशासन चांगलेच जागरूक झाले आहे. एकेकाळी केवळ वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणारे आरटीओचे पथक आता चालकांनी मद्यप्राशन केले आहे की नाही, याची तपासणी करीत आहेत. यासाठी पथकाला ब्रेथ ॲनालायझर यंत्रही देण्यात आले आहे. तीन दिवसांत २४२ वाहनधारकांची तपासणी केली असता, त्यात १८ जण मद्यप्राशन केल्याचे आढळले आहे. त्यांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने जणू मोहीमच हाती घेतली आहे. त्यामुळे राज्यभरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या मार्गदर्शनात चार मोटार वाहन निरीक्षकांचे पथक कामाला लागले आहे. मागील तीन दिवसांत केवळ ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या जात आहेत. यात २४२ वाहन चालकांची ब्रेथ ॲनालायझरच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यात १८ जण मद्यप्राशन करून वाहन चालवित असल्याचे आढळून आले आहेत. यात सर्वाधिक दुचाकी व कारचालक असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात संबंधित वाहनचालकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणे चालकांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
तर ट्रॅव्हल्सचे परमिट रद्द...प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने तीन दिवसात विविध वाहनचालकांची तपासणी केली आहे. यात काही ट्रॅव्हल्स चालकांचीही तपासणी करण्यात आली. दोषी आढळून आलेल्यांमध्ये सर्वाधिक दुचाकी व कार चालकांचा समावेश आहे. मुंबई, पुण्याहून लातूरला येणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांची विशेष तपासणी केली जाणार आहे. यात एखादा चालक मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यास ट्रॅव्हल्सचा परवानाच रद्द करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले.
२५२ वाहन चालकांची केली तपासणी...परिवहन विभागाच्या पथकाने तीन दिवसांत २५२ वाहन चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली आहे. त्यात ४२ ट्रॅव्हल्सचालकांचाही समावेश आहे. तपासणीत दोषी आढळलेल्या वाहनचालकांत दुचाकी ९, कार ५ व इतर ४ वाहनचालक आहेत. त्यांना प्रत्येकी १० हजार दंड ठोठावण्यात आला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या केसेस वाढविण्यासाठी परिवहन विभाग सरसावला आहे.