लातूर : जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून, १०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३८३.३ मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे पिके जोमात आली असून, पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. त्या परिसरातील तेरणा नदीवरील बॅरेजेस ओव्हरफ्लो झाले आहेत. तर इकडे लातूर तालुक्यातील मांजरा नदीवरील बॅरेजेस अद्याप भरलेले नाहीत. त्यामुळे या परिसरात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पिकांसाठी पोषक पाऊस होत असला तरी पाण्याच्या संचयासाठी मोठ्या पावसाची आणखीही गरज आहे. लातूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत १०.८ मि.मी. पाऊस पडला असून, लातूर तालुक्यात ११.८, औसा १८.५, अहमदपूर १४.०२, निलंगा १४.०७, उदगीर ६.३, चाकूर ७.००, रेणापूर ३.८, देवणी ५.०, शिरूर अनंतपाळ ७.६, जळकोट तालुक्यात ९.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊस
आतापर्यंत जिल्ह्यात ३८३.३ मि.मी. पाऊस झाला असून, लातूर तालुक्यात ३६५.२, औसा ३५९.०, अहमदपूर ४०९.२, निलंगा ३३९.४, उदगीर ४६४.३, चाकूर ३९३.१, रेणापूर ४०१.९, देवणी ३०७.०, शिरूर अनंतपाळ ३३७.२, जळकोट तालुक्यात सर्वाधिक ४८८.२ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.