उदगीर : राज्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या ४० तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यातील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळ सुदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यात लातूर जिल्ह्यातील ४६ मंडळाचा तर उदगीर तालुक्यातील उदगीर, हेर, देवर्जन, वाढवणा, नळगीर या पाच मंडळाचा समावेश आहे. या दुष्काळ जन्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या महसुली मंडळातील शेतकरी व शेत मजुरांना विविध सवलती शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाने १० नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत.
लातूर जिल्ह्यातील लातूर, बाभळगाव, हरंगूळ, कासारखेडा, मुरुड, गातेगाव, तांदूळजा, चिंचोली, औसा, लामजना,भादा, मातोळा, बेलकुंड, किनीथोट, किल्लारी, निलंगा, पानचिंचोली,निटूर, औराद शहाजानी, कासार बालकुंदा, अंबुलगा, मदनसुरी, कासार शिरसी, शिरूर अनंतपाळ, साकोळ, हिसामाबाद, वाढवणा, नळगीर, हेर, देवर्जन, उदगीर, जळकोट, घोणशी, देवणी, वलांडी, चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी बु., अहमदपूर, खंडाळी, किनगाव, हडोळती, अंधोरी, शिरूर ताजबंद, या ४६ महसुली मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या दुष्काळ जन्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या महसुली मंडळातील लोकांना विविध सोयी सवलती दिल्या जाणार आहेत.
शासनाकडून मिळणार या सवलती...जमीन महसूल सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता , आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती मिळणार आहेत. शासनाने यापुर्वी केवळ ४० तालुक्यातच दुष्काळ जाहीर केला होता. यामध्ये जिल्ह्यातील केवळ रेणापूर तालुक्याचा समावेश होता. त्यामुळे उर्वरित भागातही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती. त्यास शासनाकडून प्रतिसाद मिळाला असून, लातूर जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध सवलती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.