उदगीर (जि़ लातूर) : वडील आणि दोन मुले, असे तिघे जण निडेबन शिवारातील विहिरीच्या काठावर गुरूवारी रात्री दारू पीत बसले होते़ तोल गेल्याने एक मुलगा विहिरीत पडला़ त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी उडी घेतली़; परंतु दोघेही बुडाले़ वडील, भावाला वाचविण्यासाठी तिसऱ्याने उडी घेतली. मात्र, दोघांना वाचविण्यात यश आले नाही़ बालाजी मारुती मामूलवार (२०), मारुती गंगाराम मामूलवार (५८), अशी मृतांची नावे आहेत.
मारूती गंगाराम मामूलवार, बालाजी मारुती मामूलवार व गंगाधर मारुती मामूलवार या तिघा बाप-लेकांनी गुरूवारी रात्री राजकुमार पांचाळ यांच्या शेतातील विहिरीच्या काठावरून बसून दारू प्राशन केली़ मामूलवार कुटुंबिय हे मजुरी करून उदनिर्वाह करतात़ रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बालाजीचा नशेमुळे तोल गेला आणि तो विहिरीत पडला़ त्याला वाचविण्यासाठी वडिल मारुती यांनी विहिरीत उडी घेतली़ त्या दोघांना वाचविण्यासाठी दूसरा मुलगा गंगाधर यानेही विहिरीत उडी मारली़ परंतु, गंगाधरला वडील व भावाला वाचविण्यात यश आले नाही़ या घटनेत मारुती मामूलवार, मुलगा बालाजी यांचा बुडून मृत्यू झाला़ रात्री उशिरा दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले़ याप्रकरणी निडेबनचे पोलीस पाटील मधूकर रंगवाळ यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़