शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. गुरुवारपर्यंत तालुक्यात एकूण बाधितांची संख्या ४ हजार १४६ वर पोहोचली होती. त्यापैकी ३ हजार १०८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्ण ९७७ असून, होमआयसोलेशनमध्ये ८०० तर कोविड केअर सेंटरमध्ये १४७ जण उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची प्रभावीपणे शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे, तसेच दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे.
ग्रामीण रुग्णालयातील कोविड रुग्णांवर डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून विनाविलंब सेवा दिली जात आहे, तसेच माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर हे विशेष लक्ष देऊन आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वारंवार प्रयत्नशील आहेत. त्यांनी आपल्या फंडातून चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले आहे. लसींची पूर्तता, ऑक्सिजन सिलिंडरपुरवठा, आक्का फाउंडेशनतर्फे रुग्णालयातील कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांना मोफत भोजन देण्याची सोय करण्यात आल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे, तसेच या फाउंडेशनतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा निरंतर केला जात आहे. सध्या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वस्तू खरेदीसाठी नागरिक येत आहेत. त्यानंतर मात्र, संचारबंदीचे पालन तंतोतंत केले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे.
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावे. आपण, आपले कुटुंब व आपले शहर सुरक्षित राहील, यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील म्हणाले.