रेणापूर (जि. लातूर) : कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याने पत्नी व दोन मुलांना विष पाजून गळ्यावर ब्लेडने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:ही विष पिऊन व गळ्यावर वार करून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील शेरा गावालगतच्या उसाच्या फडात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुदैवाने चौघे जण बचावले आहेत.
पोलिसांनी सांगितले, आतिष बाबूराव नरके (रा. नृसिंहनगर, लातूर) यांनी पत्नी विशाखा (३४), मुलगा पारस (१४), लोकेश (१२) यांना आपण फिरायला जाऊ असे सांगून बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून (क्र. एमएच २४ एक्स ३३१०) अंबाजोगाईला नेले. तिथे राहण्यासाठी लॉज न मिळाल्याने हॉटेलवर नास्ता करून पुन्हा ते लातूरकडे निघाले. दरम्यान, रस्त्यातील शेरा पाटीवरून त्यांनी दुचाकी शेरा गावाकडे वळविली. तेथील एका शेतातील उसाच्या फडात थांबले.
यावेळी नरके यांनी टॉनिक असल्याचे सांगत पत्नी व दोन्ही मुलांना विष पाजून त्यांच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यामुळे तिघेही बेशुद्ध पडले. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून गळ्यावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मामाला फोन केल्याने बचावले...जखमी पारस शुद्धीवर आला आणि त्याने वडिलांजवळील मोबाइलवरून मामा श्रीकांत रमेश पवार (रा. सुगाव, ता. अंबाजोगाई) यांना फोन करून घडलेली घटना सांगितली. आम्हाला घेऊन जाण्यासाठी तत्काळ मोठी गाडी घेऊन या, असेही तो म्हणाला.
दोघांची प्रकृती गंभीर...श्रीकांत पवार हे नातेवाइकांसह चारचाकी वाहन घेऊन संबंधित ठिकाणी पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर मेहुणे आतिष नरके, बहीण विशाखा नरके, भाचा पारस व लोकेश हे सर्व जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यात पारस हा थोडा शुद्धीवर होता, तर इतर तिघे जण बेशुद्ध होते. चौघांना नागरिकांच्या मदतीने लातूरच्या एमआयटी रुग्णालयात दाखल केले. विशाखा व लोकेश यांची प्रकृती गंभीर असून, आतिष नरके हे शुद्धीवर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
वडिलांवर गुन्हा दाखल...कर्जबाजारीपणामुळे मी सर्वांना विष पाजून ब्लेडने गळे चिरले. सर्वांना जीवे मारून मीही स्वतः आत्महत्या करणार होतो, असे आतिष नरके यांनी श्रीकांत पवार यांना सांगितले. पवार यांच्या माहितीवरून रेणापूर पोलिसांत आतिष नरके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पोनि. सोपान सिरसाट यांनी घटनास्थळाची पाहणी केली.