रेणापूर (लातूर): शहरातील श्रीराम विद्यालयाचे उपप्राचार्य निवृत्ती तुळशीराम उगीले यांनी शाळेतच गळफास घेवून सकाळी आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे़
रेणापूर शहरातील श्रीराम विद्यालयात निवृत्ती तुळशीराम उगीले (वय ५५ रा़ रेणापूर) हे अनेक वर्षांपासून क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते़ सध्या ते उपप्राचार्य म्हणून काम पाहत होते. आज सकाळी साडेआठ वाजता शाळेत आले होते. शिपायास बोलावून ग्रंथालयातील रूममध्ये गेले. त्यानंतर त्यांनी ग्रंथालयातच गळफास घेतला.
हा प्रकार शिपायाच्या लक्षात आल्यानंतर त्याने लागलीच उगिले यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. उगिले यांना यानंतर रूग्णालयात दाखल केले असता डॉ़ तांदळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. बीट अमलदार अशोक चौगुले यांनी ग्रामीण रूग्णालयात पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली.
घटनास्थळी सापडली चिठ्ठीग्रंथालयात आत्महत्या केलेल्या ठिकाणी उगीले यांनी लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे. यात त्यांनी, 'माझ्या आजारपणामुळे कंटाळून जीवन संपवत आहे़ योगेश, निलेश आईची काळजी घ्या़ माझ्या ह्या वाईट कृत्यास कोणासही जबाबदार धरू नये.' असे नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.