लातूर : मुलांचे वय वाढू लागले की, त्यांच्यातील जन्मजात असलेले व्यंगही दिसू लागतात. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे धावाधाव सुरु होते. मात्र, पालकांनी वेळीच लक्ष देऊन उपचार घेतल्यास या समस्येवर मात करता येऊ शकते. दरम्यान, जिल्ह्यात चार महिन्यांत अंगणवाडी व शाळांमध्ये केलेल्या आरोग्य तपासणीत ४५ बालकांत तिरळेपणा आढळून आला आहे. त्यातील २२ मुलांवर शस्त्रक्रिया करुनच तिरळेपणा दूर करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाच्या वतीने सन २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालक, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीसाठी जिल्ह्यात एकूण ३० वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते.एप्रिल ते जुलैअखेर या कालावधीत जिल्ह्यातील २५८७ अंगणवाड्यातील १ लाख ६० हजार ४५६ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जुलैमध्ये ६८ हजार ९६८ शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात तिरळेपणाची लक्षणे असलेली ४५ मुले आढळून आली आहेत. ही तपासणी तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक अमोल झेंडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
४५ मुलांना तिरळेपणाची लक्षणे...राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ४२४ मुला- मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात ४५ जणांमध्ये तिरळेपणाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांची अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात २२ मुलांमधील तिरळेपणा दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आतापर्यंत ६ बालकांवर शस्त्रक्रिया...
अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत २२ पैकी ६ बालकांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उर्वरित बालकांवर टप्प्याटप्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दरम्यान, ४५ पैकी २३ बालकांना चष्मा व औषधी देण्यात आली आहेत.
अक्षरे व्यवस्थित दिसत नसल्यास काळजी घ्या...तिरळेपणा हा जन्मजात असू शकतो. बालकांना शाळेत फलकावरील अक्षरे व्यवस्थित दिसत नसल्यासही होऊ शकतो. सततची डोकेदुखी, चष्मा लागूनही तो न वापरण्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. श्रीधर पाठक, नेत्र शल्यचिकित्सक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय.
वेळेवर उपचार घेणे अत्यंत गरजेचे...तिरळेपणा हा जन्मजात अथवा बाळांतपणात गुंतागुंत निर्माण झाल्याने निर्माण होऊ शकतो. शिवाय, नजर कमी झाल्याने किंवा चष्मा लागूनही तो न वापरल्याने होतो. त्यामुळे पालकांनी वेळीच काळजी घ्यावी. त्याकडे दुर्लक्ष करु नये.
- डॉ. नंदकुमार डोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.