लातूर :
राज्यात लम्पी चर्मरोगाचा संसर्ग वाढला आहे. तो नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपायोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु, प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सेवेच्या दररोजच्या वेळत अडीच तासांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय, रविवारीही पशुवैद्यकीय सेवा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टीही बंद झाली आहे.
राज्यातील गोवंशीय पशुधनात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. माशा, डास, गोचिड, चिलटांमुळे तो दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्गाच्या प्रतिबंधासाठी जनावरांचे बाजार, वाहतूक, शर्यती, प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच बाधित जनावारांच्या गावांना केंद्रबिंदू धरुन त्याभोवतीच्या ५ किमी त्रिज्येच्या परिसरातील गावांत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या वतीने मोफत उपचार, लसीकरण करण्यात येत आहे.
लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शेतकरी, पशुपालकांकडील पशुधनास आवश्यक त्या पशुवैद्यकीय सेवा तात्काळ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तालयाने हा रोग नियंत्रणात येईपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून राज्यातील जिल्हा पशुवैद्यकीय, तालुका, श्रेणी- १ व २, सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आणि फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दैनंदिन वेळेत अडीच तासांची वाढ केली आहे. पूर्वी सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० वा. पर्यंत पशुवैद्यकीय दवाखाने सुरु राहायची. आता सकाळी ८ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत सुरु राहणार आहेत.
आकस्मिक प्रसंगी २४ तास सेवा...पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात रविवारची सुट्टीही बंद करण्यात आली आहे. तसेच पशुपालकांसाठी आकस्मिक प्रसंगी २४ तास पशुवैद्यकीय सेवा सुरु राहणार आहे. कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सकाळी कामाच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर आणि सायंकाळी अर्धा तास उशिरा थांबावे लागणार आहे.- डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.
जिल्ह्यात २५६ बाधित जनावरे...जिल्ह्यात एकूण १२२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. लातूर, औसा, निलंगा, चाकूर, उदगीर, अहमदपूर, देवणी, रेणापूर या आठ तालुक्यांतील ३२ गावांत लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. तेथील २५६ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यात ३ जनावरे दगावली आहेत. सध्या ३५ हजार ५२३ जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.