लातूर : वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् अचानक आलेल्या पावसामुळे लातूर शहरातील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली. सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरूवात केली. त्यातच वीजही गुल झाली. दिवसभर वातावरणात उकाडा होता, सायंकाळी पाच वाजेपासून ढगाळ वातावरण झाले होते. अवकाळी पावसामुळे काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गंजगोलाई भागात नेहमीप्रमाणे बाजारात ग्राहकांची वर्दळ होती. रमजान महिना सुरू असल्याने या भागात अनेकांनी दुकाने थाटली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत या भागात खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे अनेकजण विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात. रविवारी सायंकाळी ग्राहकांची गर्दी सुरू असताना अचानक जोरदार वारे अन् पावसाने सुरूवात केल्याने धावपळ उडाली. अनेक फळविक्रेते, भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना याचा मोठा फटका असल्याचे फळविक्रेते शादुल शेख यांनी सांगितले.
भाजीपाला भिजला, पालही उडाले...
बार्शी रोडवर दयानंद गेट ते संविधान चौक समांतर रस्त्यावर भाजीपाला बाजारातही व्यावसायिकांची धावपळ झाली. अनेकांनी नजीकच्या दुकानांत पावसापासून बचावासाठी आश्रय घेतला. शेतकऱ्यांचा भाजीपाला मात्र उघडा पडला. पावसाने उघडीप दिल्यावर काही शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार भाजीपाल्यांची विक्री केली. उन्हापासून बचावासाठी लावण्यात आलेल्या पालांचे प्लास्टिक वादळी वाऱ्यात उडून गेले. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे भाजीपाला विक्रेते गफूर शेख, सुनंदा माने यांनी सांगितले.
रस्त्यांवर पाणीच पाणी...वादळी वारे थांबल्यावर सायंकाळी ६.३५ ते ७.२० वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू होता. लातूर शहरातील प्रमुख मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याने पाणी वाहत होते. पाच नंबर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, जुना रेणापूर नाका, बार्शी रोडवरील भाजीपाला, फळबाजार, नांदेड रोडवरील स्वामी विवेकानंद चौकातील व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने दुपारनंतर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ असते, त्यामुळे अनेकजण मालाची खरेदी करून दुकानात सजावट करून बसतात. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसाने चांगलीच धावपळ झाली.
आंबा, टरबूज, ज्वारीचे नुकसान...
रबी हंगामातील ज्वारीची काढणी तसेच राशीचे काम सध्या केले जात आहे. वातावरण उष्णतेचे असल्याने शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेली ज्वारी कणसं पावसात भिजली आहेत. तर ज्यांची काढणी शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांची उभी ज्वारी वादळी वाऱ्यात आडवी झाली आहे, पावसामुळे ज्वारी काळी पडणार, दर कमी मिळाल्याने आर्थिक फटका बसण्याची भिती शेतकरी महादेव भिसे यांनी सांगितले. वादळी वाऱ्यात आंब्याच्या कैऱ्या झडून गेल्या आहेत.