देवणी : येथील होमगार्ड शिवाजी शृंगारे यांच्या घरी गॅसचा स्फोट झाल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६:३० वाजता घडली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत बचावकार्य केले. त्यामुळे जिवितहानी टळली.
देवणी पोलीस स्टेशनसमोर होमगार्ड शिवाजी शृंगारे यांचे घर आहे. शु्क्रवारी सकाळी त्यांच्या पत्नीने गॅस शेगडी पेटवली असता अचानक भडका उडाला. शृंगारे यांच्या पत्नी तेथून लागलीच बाहेर पडल्या. त्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरामध्ये मोठी आग लागली. या आगीत संसारोपयोगी वस्तू, कपडे, दोन मोबाईल, फॅनसह रोख रक्कम चाळीस हजार आणि दोन ते अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने असे जवळपास एक लाखाच्या वस्तू व रक्कम जळून खाक झाली. स्फाेट झाला त्यावेळी दोन बालके घरात झोपलेले होते. कुटूंबानी सतकर्ता दाखवत तातडीने मुलांना घराच्या बाहेर नेले. या घटनेत शृंगारे यांच्या घरातील सर्वच साहित्य भस्मसात झाले असून, त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.